गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला अटक

ठाणे, 9 एप्रिल : ठाण्यात सध्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यात आता थेट ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे.

ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15,00,000 रुपयांची लाच मागितली होती. तीस वेंटिलेटर मागे दहा टक्के लाच मागितली होती. या पंधरा लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये डॉक्टर राजू मुरुडकर यांनी ऐरोलीतील लाईफलाईन रुग्णालयात घेतले. हे पैसे घेत असताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून डॉक्टर राजू मुरुडकर यांना रंगेहात अटक केली आहे.

एकीकडे ठाण्यात दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बेड मिळत नाही. तर सध्या बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमालीचे कमी असल्याचे आढळून येत असल्याने वेंटिलेटर बेडची मागणी जास्त प्रमाणात येऊ लागली आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेने व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात डॉक्टर राजू मुरुडकर हे प्रमुख भूमिका बजावतात आणि याच अधिकाराचा फायदा घेऊन डॉक्टर राजू मुरुडकर यांनी व्हेंटिलेटर बनवणाऱ्या कंपनीकडून लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी डॉक्टर राजू मुरुडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *