ताज्याघडामोडी

मार्चचा शेवटही पावसानेच! राज्यातील या जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही झाली. ज्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

अशातच आता पावसासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यानुसार आता मार्चचा शेवटही अवकाळी पावसानेच होणार आहे. 30 आणि 31 मार्च तसंच 1 एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईमध्ये मार्चच्या अखेरीस ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील 4 जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ मार्चला ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच खान्देश, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर याठिकाणीही पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने याबद्दलची माहिती दिली आहे.

यानुसार देशातही पावसाची आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमिनोत्री, शिमला, कुलू, मनाली, देहराडून आणि अमृतसर याठिकाणी आजपासून 3 दिवस पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने कमाल तापमान वाढलं आहे. अशातच आता राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *