मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये बीएम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानं महाविद्यालयाच्या ५४ वर्षीय महिला प्राचार्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. सोमवारी ही घटना घडली. प्राचार्यिकेची अवस्था गंभीर आहे. चोईथराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या ८० टक्के भाजल्या आहेत. महिला प्राचार्याला पेटवल्यानंतर आरोपी आत्महत्या करायला निघाला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.
महाविद्यालय सुटल्यानंतर प्राचार्या विमुक्ता शर्मा त्यांच्या घराकडे जायला निघाल्या होत्या. त्याआधी त्या झाडावरून बेलाची पानं तोडत होत्या. त्यांच्या महाविद्यालयात शिकलेला विद्यार्थी आशुतोष श्रीवास्तव त्याचवेळी मागून आला. त्यानं शर्मांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवलं. त्यांना इंदूरच्या चोइथराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
विमुक्ता शर्मा ८० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक भगवत सिंह बिरदे यांनी दिली. विमुक्ता यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. विमुक्ता यांना पेटवून दिल्यानंतर आरोपीनं तिंछा फॉलच्या रेलिंगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपी आशुतोषनं पोलीस चौकशीत शर्मांना पेटवून देण्यामागचं कारण सांगितलं. एक गुणपत्रिका या सगळ्यामागचं कारण ठरली. ‘मी जुलै २०२२ मध्ये बी. फार्माची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. मात्र महाविद्यालयानं गुणपत्रिका दिली नाही,’ असं आशुतोषनं पोलिसांना सांगितलं. तर आमच्याकडे अद्याप आशुतोषची गुणपत्रिका पोहोचलीच नसल्याचं महाविद्यालय व्यवस्थापनानं सांगितलं.
आरोपी आशुतोष श्रीवास्तवनं काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या एका कर्मचाऱ्यावर चाकूनं हल्ला केला होता. त्यावेळीही त्याला अटक झाली होती. महाविद्यालयाकडून गुणपत्रिका मिळत नसल्यानं आशुतोष संतापला होता. त्यानं रागाच्या भरातून प्राचार्य विमुक्ता शर्मांना पेटवून दिलं.