गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोटच्या मुलांनी वृद्धाश्रमात टाकलं, बापाने धडा शिकवला, करोडोंची संपत्ती सरकारला केली दान

पोटच्या मुलांनी वडिलांचा सांभाळ करायला नकार दिला, वृद्धाश्रमात टाकलं. निराश झालेल्या वडिलांनी त्यांची संपूर्ण संपत्ती राज्यपालांच्या नावे केली आहे. इतकंच नव्हे तर मृत्यूनंतर अंतिम संस्कार हे मुलाच्या हातून होऊ नयेत, असंही मृत्यूपत्रात म्हटलं आहे.

बुढाना येथील ८५ वर्षीय नत्थू सिंह यांनी आपल्या लेकाला धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नत्थू सिंह गेल्या सात महिन्यांपासून वृद्धाश्रमात राहतात. या वृद्ध आजोबांनी आपल्या मुलांच्या वागणुकीमुळं नाराज होऊन जवळपास १० एकर जमीन व घरसह स्वतःचे शरीरही उत्तर प्रदेश सरकारच्या नावावर केलं आहे. नत्थू सिंह यांनी दान केलेल्या जमिनीची किंमत करोडो रुपये आहे. नत्थू सिंह यांना दोन मुलं आणि चार मुली असून त्यातील एका मुलाचे निधन झाले. तर एक मुलगा सहारनपुरमध्ये शिक्षक आहे. सून आणि मुलांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं रोजच्या भांडणाला वैतागून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या २२ वर्षांपासून नत्थू सिंह स्वतःच जेवण स्वतःच बनवतात. मुलगा व सून त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. वृद्धावस्थेत त्यांना दोघांनी मारहाण करुन घराच्या बाहेर काढले. त्यांच्या जमिनीवरही कब्जा करण्यात आला. अशावेळी त्यांनी सरकारकडेच मदतीची मागणी केली. नत्थू सिंह यांनी मृत्यूपत्र बनवत त्यांची पूर्वजांची जमिन सरकारला दान केली आहे. या जमिनीवर रुग्णालय किंवा शाळा सुरु करावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच, आपलं शरीरही मेडिकल कॉलेजला दान केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *