ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, अडचणीत वाढ

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र, यापुढे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. परंतु, आता हसन मुश्रीफ यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाच्या आधारे ईडी हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पोलिसांच्या तक्रारीत हसन मुश्रीफ यांनी सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा करुन ते वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आणि संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या काही सभासदांनी याविरोधात शनिवारी मुरगुड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे. या षडयंत्रामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशाराही मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच ईडीकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर छापा टाकण्यात आला होता. हसन मुश्रीफ यांच्या आर्थिक लागेबांध्यांचा माग काढण्यासाठी जिल्हा बँकेवर छापा टाकण्यात आल्याची चर्चा होती. यावेळी ईडीकडून बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. तत्पूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आणि कार्यालयावरही ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने अनेक कागदपत्रं ताब्यात घेतली होती. तेव्हापासूनच ईडीकडून हसन मुश्रीफ यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाईल, अशी चर्चा सुरु आहे. यानंतर आज पोलिसांनी हसन मुश्रीफ यांच्यावर पहिलाच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *