उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. शहरातील शहाड परिसरातील एका कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.
अमित (वय २६ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या लहान भावाचं नाव आहे. तर रोहित (वय २८ वर्ष) असे निर्घृणपणे हत्या झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित आणि आरोपी अमित हे दोन्ही सख्ख्ये भाऊ असून ते उल्हासनगर शहरातील एका कॉलनीत एकत्र राहतात.
दोघांचाही विवाह झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मोठा भाऊ मृत रोहित याचे लहान भाऊ अमितच्या पत्नीशी जवळीक वाढली होती. यातून दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबध निर्माण झाले. दरम्यान, एका दिवशी आरोपी अमित याने रोहितला आपल्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत बघितले.
यावरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. त्यावेळी हा सर्व प्रकार चुकून घडला असं म्हणत रोहितने अमित याची समजूत काढली. दरम्यान, काही दिवसानंतर पुन्हा अमितने आपल्या पत्नीला रोहितच्या रुममध्ये जाताना बघितले. त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता, दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते.
आपल्या मोठ्या भावाला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहून अमितला संताप अनावर झाला. त्याने भावाचा हत्येचा कट रचला. शुक्रवारी रोहित हा उल्हासनगर शहरातील शहाड फाटक परिसरात छत्रपती शाहू महाराज कॉलनीत राहणाऱ्या आजीकडे आला होता. त्यावेळी आजीच्या घरातच आरोपी अमित आणि रोहित या दोन भावांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण झाल्यानंतर रोहित आजीच्या घरात झोपला होता.
यावेळी आरोपी भाऊ अमितने घरातील दगडी पाटा थेट झोपलेल्या रोहितच्या डोक्यात मारून त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ भेट देत पंचनामा करत रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी आरोपी अमित याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून अमितला अटक केली आहे.