ताज्याघडामोडी

प्रियकराने बोलणे थांबवले, संतापलेल्या तरुणीने आईचा गळाच घोटला, पण सुदैवाने…

प्रियकराने बोलणं बंद केल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलीने आईला दोषी धरत जन्मदात्या आईचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर भागात समोर आली असून दामिनी पथकाच्या मदतीने तरुणीवर मानसोपचार तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत.

प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय राणी (नाव बदलेले) ही अभ्यासात खूप हुशार होती. कोणतेही क्लासेस न लावता तीला १० वी मध्ये चांगले गुण मिळाले होते. त्यानंतर तिचा चांगल्या महाविद्यालयात नंबर लागला होता. त्यामुळे तिला पुढील शिक्षणासाठी दुसऱ्यागावी जावे लागले, तिथे राणी हॉस्टेल मध्ये राहत होती. दरम्यान तिथे तिची ओळख एका तरुणाशी झाली.ओळखीतून मैत्री आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांना भेटू लागले, बोलू लागले सोबत फिरू लागले मात्र ही गोष्ट राणीच्या घरच्यांना माहिती झाली. त्यामुळे राणीला काही दिवसांपूर्वी आई-वडिलांनी बोलावून घेतले.

वसतिगृहातून घरी आल्यापासून प्रियकर बोलत नसल्याने राणी घरात सतत चिडचिड करायची. दोन दिवसांपूर्वी तिने आईवर हात देखील उगारला होता. मात्र आता तिच्या प्रियकराने बोलायचं नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे ती अधिकच संतापली व आईला या सर्व प्रकरणात दोषी धरून आईच्या अंगावर बसून आईचा गळा घोटत होती. दरम्यान आरडाओरड झाल्याने शेजारी धाऊन आले. त्यांनी कसेबसे राणीच्या तावडीतून तिच्या आईला सोडवले दरम्यान शेजाऱ्यांनी दामिनी पथकाला माहिती देत बोलावून घेतले होते. दामिनी पथकाने राणी व तिच्या आई वडिलांना ठाण्यात बोलावून घेत कायदेशीर प्रक्रिया पार पाडत राणीला शहरातील एका मानसोपचार तज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *