शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर गेले सात-आठ महिने सुरू असलेला लढाईत अखेर शिंदे गटाने बाजी मारली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव यांच्या गटाला या निर्णयाचा जबर हादरा बसला आहे. दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभेतील ६ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवरुन चारच खासदार असल्याचं दिसत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं असून ते दोन खासदार कोण?, असा सवाल उपस्थित होत आहे.
निवडणूक आयोगाकडील कागदपत्रांनुसार लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेत ठाकरे आणि शिंदे गटाचे किती खासदार आणि आमदार आहेत याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. शिंदे गटाकडे विधानसभेचे ५५ पैकी ४० आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे १५ आमदार आहेत. तर, विधानपरिषदेचे ठाकरे गटाकडे १२ पैकी १२ आमदार आहेत शिंदे यांच्याकडे शून्य आमदार आहेत.
राज्यसभेत ठाकरे गटाकडे तीनपैकी तीन खासदार आहेत. तर, शिंदे गटाकडे शून्य खासदार आहेत. लोकसभेतील १९ खासदारांपैकी शिंदे गटाकडे १३ खासदार आणि ठाकरे गटाकडे चारच खासदार आहेत. मात्र, ठाकरे गटाने सहा आमदार असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र निवडणूक आयोगाकडे फक्त चार खासदारांचीच प्रतिज्ञापत्रे आली आहे. त्यामुळं हे दोन खासदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का? किंवा तटस्थ राहिले आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे.