केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठे पाऊल टाकायचे ठरवले आहे.
शिवसेना पक्ष ताब्यात आल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह आजुबाजूच्या भागांमधील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तीव्र संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. मुंबईत शिवसेना पक्ष तळागाळात रुजण्यात शाखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडून या शाखा ताब्यात घेऊन ठाकरे गटाचे राजकीय अस्तित्त्व संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर दापोलीत योगेश कदम यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या एका शाखेचा ताबा घेतला होता. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. तसाच प्रकार आता मुंबईत पाहायला मिळू शकतो.
मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून शाखा ताब्यात घेण्यासाठी खास रणनीती अवलंबली जाऊ शकते. मोठा संघर्ष टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून हळूहळू आणि टप्याटप्प्याने शिवसेनेच्या शाखांवर कब्जा केला जाऊ शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांना दिल्याने ठाकरे गट शिवसेनेच्या शाखांवर कायदेशीररित्या ताबा कसा राखू शकतो, हादेखील एक प्रश्नच आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत १२ ते १३ शाखाप्रमुख वगळता फारजण शिंदे गटात गेले नव्हते. त्यामुळे मुंबईतील शिवसेनेची ताकद अबाधित असल्याचे सांगितले जाते. अंधेरी पोटनिवडणुकीच्यावेळी ऋतुजा लटके यांच्या प्रचारादरम्यान त्याचा प्रत्यय आला होता.
मुंबईत शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत, तर मुंबई महानगर क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व शाखांची संख्या तब्बल ५०० च्या घरात जाते. या शाखा या शिवसेना पक्षाच्या नावावर नाहीत, तर स्थानिक शाखाप्रमुखांच्या नावावर आहेत. आतापर्यंत मुंबईतील बहुतांश शाखाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिल्यानंतर हे सर्व शाखाप्रमुख आमच्याकडे येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांना आहे. या शाखा ताब्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून शाखांमधील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले जातील, अशी चर्चा आहे. त्याजागी एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबिरी शाखांमध्ये लावल्या जाऊ शकतात.