ताज्याघडामोडी

‘त्या’ संध्याकाळी काय घडलं? रक्ताळलेल्या कपड्यांसह ‘तो’ घाईघाईने बाहेर पडला, वॉचमन समोर येताच म्हणाला…

जोगेश्वरी परिसरातील एका सोसायटीमध्ये मंगळवारी एका केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. जोगेश्वरीच्या मेघेवाडी परिसरातील श्री समर्थ सोसायटीमध्ये सुधीर कृष्णकुमार चिपळुणकर (वय ७२) आणि सुप्रिया सुधीर चिपळुणकर (वय ६५) यांच्या घरी हा प्रकार घडला होता. साधारण १५ दिवसांपूर्वी पप्पू गवळी याला सुधीर चिपळुणकर यांच्या सुश्रूषेसाठी कामाला ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळी सात वाजता चोरीच्या उद्देशाने पप्पू गवळी याने सुधीर आणि सुप्रिया चिपळुणकर यांच्यावर धारदार चाकूने वार केले होते. पप्पूने सुधीर चिपळुणकर यांचा गळा चिरल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यानंतर पप्पू गवळीने सुप्रिया चिपळुणकर यांच्यावरही वार केले. परंतु, सुप्रिया चिपळुणकर यांनी खिडकीतून भांडी खाली फेकत आणि आरडाओरडा करत आजुबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. त्यामुळे घाबरलेल्या पप्पूने तेथून पळ काढला होता.

चिपळुणकर दाम्पत्यावर हल्ला करुन इमारतीमधून बाहेर पडताना पप्पू गवळी खूप घाईत होता. त्यावेळी इमारतीच्या वॉचमनने त्याला हटकले. तेव्हा पप्पू गवळीच्या कपड्यांवर सर्वत्र रक्ताचे डाग होते. वॉचमनने याबद्दल विचारल्यावर पप्पूने, ‘सुधीर चिपळुणकर बेडवरून खाली पडल्याचे सांगितले. मी डॉक्टरांना आणण्यासाठी जात आहे, असे सांगून पप्पू गवळी तेथून निसटला, अशी माहिती वॉचमन शशिकांत केदार यांनी दिली. पप्पू गवळी १५ दिवसांपूर्वीच पुरुष नर्स म्हणून चिपळुणकर यांच्याकडे कामाला लागला होता. चिपळुणकर दाम्पत्यावर हल्ला केल्यानंतर पप्पू गवळी लगेच तावडीत सापडला असता. मात्र, इमारतीच्या सुरक्षा चौकीवर त्याने आजोबांना पडल्यामुळे इजा झाली आहे, अशी खोटी थाप मारली. त्यानंतर पप्पू सुरक्षा चौकीत ठेवलेली आपली बॅग घेऊन तेथून पसार झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, पप्पूने हल्ला केला तेव्हा, त्याने सुधीर चिपळुणकर यांच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार केले. त्यामुळे सुधीर चिपळुणकर बराचवेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. यानंतर इमारतीमधील काही मुलांनी सुधीर चिपळुणकर आणि सुप्रिया चिपळुणकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच सुधीर चिपळुणकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मेल नर्स पुरवणाऱ्या दिशा प्लेसमेंटस या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवताना त्याची पार्श्वभूमी तपासली जात नाही. पप्पू गवळी याला जानेवारी २०२२ मध्ये बाईक चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. या घटनेनंतर समर्थ सोसायटीतील रहिवाशी अद्याप धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुप्रिया चिपळुणकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून अद्याप त्या पूर्ण शुद्धीवर आलेल्या नाहीत. हल्ल्यानंतर शेजारचे लोक चिपळूणकर यांच्या घरात पोहोचले तेव्हा तेथील दृश्य अंगावर काटा आणणारे होते. सुधीर चिपळुणकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पप्पू गवळी दररोज बिल्डिंगच्या आवारात सुधीर चिपळूणकर यांना चालण्यासाठी घेऊन येत असे. तो चेहऱ्यावरुन अत्यंत शांत वाटायचा. तो एखाद्याला मारेल, असे मला कधीच वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया बिल्डिंगच्या वॉचमनने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *