ताज्याघडामोडी

हा टॅटू कोणाचा? नव्या नवरीला प्रश्न केला, पतीचा जीव गेला; निष्प्राण देह दोन दिवस पेटत होता

मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीच्या पतीची हत्या केली. यानंतर चंबळच्या बिहडमध्ये दोन दिवस त्याचा मृतदेह जाळला. भिंडच्या गोहद चौक परिसरात ही घटना घडली.

गोरमी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मोनू सिंहचा विवाह सहा महिन्यांपूर्वी भिंडच्या रेखा तोमरशी झाला. लग्नानंतर रेखा सासरी आली. तिच्या हातावर प्रियकराच्या नावाच्या आद्याक्षराचा टॅटू होता. रेखानं हातावर A गोंदवून घेतला होता. हा टॅटू पती मोनूनं पाहिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. रेखा आणि मोनू यांच्यात दररोज टॅटूवरून भांडणं होऊ लागली.

रेखा आणि तिचा प्रियकर अनुरागनं मोनूचा काटा काढण्याची योजना आखली. अनुराग भिंडच्या चतुर्वेदी नगरचा रहिवासी आहे. रेखाचे लग्नाआधी अनुरागशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांचे संबंध कायम होते. मोनूसोबत दररोज होत असलेल्या वादांमुळे रेखा त्रासली होती. रेखाला त्रास होत असलेला पाहून अनुराग व्यथित झाला. त्यानं मोनूला संपवण्याची योजना आखली.

मोनू दुसऱ्या शहरात गेल्याची माहिती रेखानं अनुरागला दिली. मोनू ९ फेब्रुवारीला ग्वाल्हेरला पोहोचेल, असं रेखानं अनुरागला सांगितलं. त्यानंतर अनुरागनं ग्वाल्हेर गाठलं. मोनू रेल्वे स्टेशनवर उतरला आणि बस पकडण्यासाठी आगारात पोहोचला. अनुराग त्याच्या पाठोपाठ चालू लागला. मोनू ज्या बसमध्ये बसला, त्याच बसमध्ये अनुराग बसला.

मोनू अनुरागला ओळखत नव्हता. याचाच फायदा घेत अनुरागनं त्याच्याशी मैत्री केली. मी मित्रांसोबत कारनं मेहगावमार्गे पोरसा जात आहे. रस्त्यात तुझं गाव येतं. त्यामुळे तुला सोडू शकतो, असं अनुराग मोनूला म्हणाला. त्यानंतर मोनू आणि अनुराग मेहगावला उतरले आणि कारमध्ये बसले. अनुरागनं त्याच्या तीन साथीदारांसोबत मोनूची गळा आवळून हत्या केली.

मोनूचा मृतदेह सोबत घेऊन अनुराग पांढरीत पोहोचला. त्यानं मृतदेहाला आग लावली. दुसऱ्या दिवशी अनुराग पुन्हा त्याच्या मित्रांना घेऊन पांढरीत गेला. त्यानं मोनूचा मृतदेह पुन्हा पेटवला. यानंतर मोनूनं मृतदेहांचे अवशेष एका गोणीत भरले आणि चंबळ नदी परिसर गाठला. मृतदेहांचे अवशेष त्यानं नदीत सोडले.

मोनूच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांना मोनूच्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी संशयावरून अनुरागला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्यानं संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक केली आहे. त्यात मोनूची पत्नी रेखाचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *