एका रिक्षा चालकाने ऑन ड्यूटी वाहतूक पोलिसावर लोखंडी सळईने हल्ला केल्याची घटना ११ जानेवारीला रात्री घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
राकेश घाडगे असं जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून खारघर पोलीस हल्लेखोर रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच घटनास्थळावरुन पोलिसांनी रिक्षा जप्त केली असून ती रिक्षा एका महिलेच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रिक्षा चालकाला भाडेतत्वावर वाहन दिले असल्याचा दावा महिलेने केला आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ११ जानेवारीला पोलीस कर्मचारी घाडगे रात्रपाळीसाठी ड्यूटीवर होते. खारघर फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या सायन-पनवेल महामार्गावर असणाऱ्या पोलीस चौकीत एक अज्ञात इसम आला. त्यावेळी हल्लेखोराने घाडगे यांच्यावर हल्ला चढवला.
त्यानंतर पोलीस घाडगे यांच्या हाताला दुखापत झाली. घाडगे यांनीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीस घाडगे यांच्यावर हल्ला झाला असल्याचे त्यांचे सहकारी पोलीस मनोज पाटील यांना कळले.
त्यानंतर त्यांनीही हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोर त्यांच्या हातातून निसटला आणि थ्री स्टार हॉटेलच्या दिशेनं त्याने धूम ठोकली. पोलीसांना त्याला पकडण्याचा पुन्हा प्रयत्न केला मात्र अंधार असल्याने हल्लेखोर फरार झाला. त्यानंतर घाडगे यांनी पनवेल लेनवर उभी असलेली आरोपीची रिक्षा जप्त केली.
त्या रिक्षात त्यांना सिटच्या मागे चाकू सापडला. तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळं त्या आरोपी रिक्षा चालकाला १५०० रुपायांचं ई चलनद्वारे दंड लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.