ताज्याघडामोडी

पत्नीच्या माहेरकडील मालमत्तेचा वाद; वकील दाम्पत्याचं आधी अपहरण मग हत्या

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. मालमत्तेच्या वादातून अपहरण झाल्याच्या, खूनाच्या घटना देखील घडत आहे. अशीच एक घटना राहुरीतून समोर आलीय. राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे दोघे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून बेपत्ता झाले होते. यामुळं वकील संघटना आणि राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर लगेच त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. राहुरी वकील संघटनेचे अध्यक्ष ऋषीकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तपास करण्याची मागणी केली. 

आढाव वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्तीत राहते. ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. राजाराम आढाव गुरूवारी दुपारपर्यंत न्यायालयात कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ते नगरला गेले होते. एका पक्षकाराला पाठवून त्यांनी पत्नी मनीषाला बोलावून घेतलं होतं, अशी माहिती मिळतेय. तेव्हापासूनच आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

आढाव यांची गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात उभी होती. राहुरी पोलीस मध्यरात्री गस्त घालत होते, तेव्हा त्यांना आढाव यांची कार न्यायालयाच्या आवारात उभी आढळली होती. राहुरी पोलीस तिची तपासणी करत होते, तेव्हा तिथे न्यायालयाच्या आवारात आणखी एक कार आली. पण, पोलिसांना पाहताच ती कार तिथून भरधाव वेगात निघून गेली.

पोलिस निरीक्षक ठेंगेंनी आढावांच्या कारची तपासणी केली. यात त्यांना एक हातमोजा, दोर, मोबाईलचे कव्हर आणि एक बूट आढळून आला. पोलिसांनी न्यायालय परिसरात पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्यांना आढावांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूला आढळली. आढाव यांचं एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर सापडलं. यावरून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय बळावला, तसं तपासात समोर आलंय. गुन्हे शोध पथकाने पोलिसांना पाहून निघून गेलेल्या कारचा शोध घेतला. यात त्यांनी तिन संशयितांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा या तिघांनी आढाव दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची माहिती दिली. आढाव दाम्पत्याची अगोदर हत्या केली. त्यानंतर त्यांना राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडाला बांधून टाकलं, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्या बारवमधील पाणी उपसलं अन् आढाव दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर काढले. या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावं समोर येत आहेत. परंतु ते दोघे पसार झाले आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून हत्या झाली, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *