ताज्याघडामोडी

एसटी संपावर आज न्यायालयात सुनावणी, 3987 कर्मचारी कामावर रुजू

एसटी महामंडळाच्या संपाची काडी फुटण्यास सुरुवात झाली असून रविवारी 3987 कर्मचारी कामावर हजर झाले. तसेच राज्याच्या विविध भागांतून रविवारी 79 बसेस चालविण्यात आल्या असून त्यातून 1746 प्रवाशांनी प्रवास केला.

गेले 18 दिवस एसटी कामगारांचा संप सुरू असून सोमवारी या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी करीत गेले अनेक दिवस एसटी कामगार संपावर गेले आहेत. याप्रकरणी संपकरी कर्मचाऱयांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन समेट घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांनी कामावर परतल्यावर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे आवाहन परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. एसटी कामगारांच्या संप प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी कामगारांच्या विलीनीकरण करण्याच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आणि अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती 12 आठवडय़ांत आपला अहवाल सादर करणार आहे.

या समितीला महामंडळाचे सध्या कर्मचारी किती आहेत? त्याचा आर्थिक भार किती येईल? याची माहिती देण्यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि त्यांच्या वेतनाचा तपशील जमा करणे सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *