ताज्याघडामोडी

राज्यात पावसाला पोषक वातावरण; ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस

मागील काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक चांगलेच गारठले होते. परंतु आता किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे थंडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकावर देखील प्रादुर्भाव होत होता. एकीकडे गारठा कमी झाला, परंतु दुसरीकडे आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. कारण हवामान विभागाने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली असून, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ज्याचं कारण म्हणजे अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार होत आहे. हे वातावरण पावसासाठी पोषक आहे, म्हणूनच राज्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नैॡत्य राजस्थान व परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किमी. उंचीवर चक्राकार वारे सुरू आहे. ज्यामुळे नैॡत्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. म्हणूनच अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होतोय, यामुळेच राज्यात ढगाळ हवामान होत आहे. तसेच उत्तर अंतर्गत तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती देखील आहे. यामुळे राज्यातील वातावरण पावसासाठी पोषक झाले आहे. हवामान विभागाने राज्यात तुरळक पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

आज सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, तसेच शेतमालही व्यवस्थित ठेवला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *