परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील डॉक्टराने 29 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार केला. तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली. उच्चशिक्षित डॉक्टरकडून या प्रकारे महिलेस वागणूक मिळाल्याची घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टर व त्यांच्या 7 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मापुरी येथे बी. एच. एम. एस शिक्षण घेतलेला इसम खाजगी प्रॅक्टिस करीत असून या व्यक्तीने नात्यातील 29 वर्षीय महिलेसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत, मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला.
पीडित महिलेने त्रासाला कंटाळून परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत व्यक्त केली असता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन 313 / 2022 कलम 377, 498 अ, 323, 504,34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी डॉक्टर व त्यांचे 7 नातेवाईक फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड हे करीत आहेत.