ताज्याघडामोडी

विवाहाच्या तोंडावर लग्नघराला आग, बस्ता पेटला, लाखोंची रोकड भस्मसात, स्वप्नांची राख

घरातील मुलीचा विवाह अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. घराला नवीन रंगरंगोटी करण्यात आली होती. घरात बस्ता, सोने, दागिने, रोख रक्कम व लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करुन ठेवल्या होत्या. मात्र आज सकाळी स्वयंपाक करत असताना घरगुती गॅसचा अचानक भडका उडाला आणि आगीत दोन्ही घरं जळून खाक झाली. धुळ्यात घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, परंतु दोन्ही घरांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील दभाषी येथील रहिवासी छोटु भिका पाटील आणि दिलीप भिका पाटील या दोन्ही भावांचे आजुबाजुला घर आहे. यात दिलीप पाटील यांच्या मुलीचा विवाह ३१ जानेवारी रोजी माळीच येथे नियोजित आहे. यासाठी त्यांनी मुलीचा बस्ता, साड्या व रोख रकमेसह इतर वस्तू आणून ठेवल्या होत्या. तसेच कापूस देखील साठवून ठेवला होता. घरात लग्न असल्याने दोन्ही घरांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

आज सकाळी घरातील महिला स्वयंपाकगृहात गेल्या असताना तिथे अचानक गॅसने भडका घेतला. यावेळी दोन्ही घरातील सदस्य घराबाहेर आल्यानंतर गॅसचा भडका उडून संपूर्ण घराला भीषण आग लागली. दोन्ही घरांना आग लागल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत दोन्ही घरे पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील संपूर्ण रोकडीसह लग्नाचा बस्ता आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले.

दोन्ही घरातील ६० हजार किंमतीचा लग्नाचा बस्ता, ९० हजार किंमतीचा कापूस, १ लाख ७० हजार किंमतीचे जीवनावश्यक वस्तू आणि ५ लाखांची रोख रक्कम जळून राख झाल्याचा दावा आहे, तर दुसऱ्या घरातील २ लाख ७० हजार किंमतीचे संसारोपयोगी साहित्य, तीन लाख १५ हजार किंमतीचा ३५ क्विंटल कापूस आणि ८० हजार रोख रक्कम जळून खाक झाल्याचा दावा केला जात आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *