ताज्याघडामोडी

आधी खोऱ्याने मारलं, नंतर ट्रॅक्टर अंगावर घातला, बॉडी घेवून तहसील कार्यालय गाठलं

शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या तरूणाच्‍या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली. अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याने त्यातून ही हत्या झाल्याची तालुक्यात चर्चा असून, हा घात की अपघात याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेतील दोषींवर कारवाई करावी याबाबत आज नातेवाईकांनी मयत शेतकऱ्याचा मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात नेल्याने खळबळ उडाली.

मांडळ येथे भाल्या नाला परिसरात यवंत यशवंत कोळी यांची शेती आहे. ते रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने दिली. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेल्यावर थोड्या वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, “जयवंत यांना खोऱ्यानं मारहाण करून त्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवण्यात आले. शेतातून नेहमी वाळूचे ट्रॅक्टर जात असतात. ट्रॅक्टरमुळे भाऊच्या शेताची पाईपलाईन फुटून मोठे नुकसान सुद्धा झाले आहे. त्यांना बोलायला गेले असता ते दमदाटी करतात. याच वादातून काल रात्री दीड दोन वाजता, जयवंत हा शेतात असताना त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालविण्यात आले”, असा आरोप मयत जयवंत यांच्या भावाने केला आहे.

जयवंत यांचा अपघात नसून त्यांचा हत्या झाली आहे. त्याचा जीव घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी कुटुंबीयांनी आज थेट जयवंत याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अमळनेर तालुक्यातील तहसील कार्यालयात नेला. “जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही.” असा आक्रमक पवित्रा मयत जयवंत यांच्या नातेवाईकांनी घेतला.

दरम्यान, यावेळी मयत जयवंत यांची पत्नी तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन काही जणांना ताब्यात घेतले असून इतरांनाही अटक केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी जयवंत यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला. याचदरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *