ताज्याघडामोडी

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साहित्यसंस्कृती पुढे नेण्याचे काम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर ग्रंथोत्सव 2022 चे उद्घाटन

राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीला उभारी देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचा महत्त्वाचा निर्णय असून, त्या त्या जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान व साहित्यसंस्कृती पुढे नेण्याचे काम ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. साहित्यसंस्कृतीत सोलापूरचा वाटा मोठा असून, मराठी साहित्यात सोलापूरच्या संतांनी, साहित्यिकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सोलापूर ग्रंथोत्सव 2022 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुभाष देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवछत्रपती शिवाजी महाराज, सांस्कृतिक भवन, (रंगभवन) येथे आयोजित या ग्रंथोत्सवास आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. रणधीर शिंदे, शहाजी पवार, शिवाजी शिंदे, राजेंद्र भोसले, आप्पासाहेब पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
ग्रंथोत्सव 2022 चे उद्‌घाटन झाल्याचे व सोलापूरच्या साहित्यिकांचे योगदान जनतेपर्यंत नेण्याचे काम ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत आहे, असे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संतसाहित्याचे अभ्यासक, साहित्यिक, लेखक वेगळ्या विषयाच्या माध्यमातून साहित्यक्षेत्राला वेगळी ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. हा ठेवा सोलापूरकरांच्या माध्यमातून राज्याला आणि देशाला लाभला असून, हा ठेवा जतन करून, आपल्या विचार, आचाराने समाजाला सुपूर्द करावा. राज्यातील प्रत्येक गाव पुस्तकांचे गाव व्हावे, असे सांगितले.
ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपण सोलापूरच्या साहित्यिकांना अभिवादन करत असल्याचे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ग्रंथ हेच गुरू ही उक्ती आहे. गुरूप्रमाणेच ग्रंथही ज्ञान देतात, वाचकाला ज्ञानसंपन्न करतात. ही वाचनचळवळ साहित्य क्षेत्राला नवी उभारी देणारी असून, साहित्यिक, लेखक, प्रकाशक ही वाचनचळवळ पुढे नेण्याचे काम अविरतपणे करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज वाचन संस्कृती कमी होत असली तरी आपल्या दृष्टीने पुढची पिढी प्रगल्भ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे महत्त्व मोठे आहे. साहित्यसंस्कृतीत सोलापूरचा वाटा मोठा असल्याचे सांगून त्यांनी सोलापूरच्या संत व साहित्यिकांचे दाखले देत मराठी साहित्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. संतांच्या या भूमितील संतसाहित्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले. आभार प्रमोद पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन भीमाशंकर बिराजदार यांनी केले. यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी ग्रंथोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा ग्रंथालय कार्यालय व संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथदिंडी
जिल्हा ग्रंथालय कार्यालय व संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथदिंडीचे संगमेश्वर महाविद्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र देसाई होते. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ग्रंथदिंडीत शहरातील ज्ञान प्रबोधिनी, सेंट जोसब विद्यालय, वसंतराव नाईक सुयश विद्यालय, ज्ञानसंपदा कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, हांचाटे विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालवीर वाचनालयाचे वारकरीचे पथक, ग्रंथालय कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्वामी यांची उपस्थिती व जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, सुनील दावडा, शिवाजी शिंदे, अहमद बांगी, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, प्रदीप गाडे, सदाशिव बेडगे, पद्माकर कुलकर्णी, येळेगावकर सर, अरविंद जोशी, डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा हरीदास रणदिवे, तसेच ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी व ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथदिंडीत लेझीम पथक, झांज पथक, स्काऊट गाईड अशा विविध कार्यक्रमांनी लक्ष वेधून घेतले.
उद्घाटनानंतर “आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त” गीत प्रबोधनाचा कार्यक्रम अनिल लोंढे सरकोलिकर सप्तरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य आणि वाड्.मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी ग्रंथ विक्री करता यावी, या उद्देशाने शिवछत्रपती शिवाजी महाराज, सांस्कृतिक भवन, (रंगभवन) येथे हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो दि. 14 पर्यंत सुरू राहणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *