ताज्याघडामोडी

मी तुमचे भविष्य सांगतो, तुमच्या घरी लक्ष्मी आलीय म्हणत वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

तुमच्या घरी लक्ष्मी आलीय. तुम्ही भाग्यशाली आहात. मी तुमचे भविष्य सांगतो. दुनियादारी चांगली नाही, तुम्ही तुमच्या गळ्यातील पोत काढून कागदाच्या पुडीत बांधून ठेव, असं सांगत दोन जणांनी हातचलाखी करत वृद्धेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविल्याची घटना जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानळदा येथे कमलबाई रामचंद्र सोनवणे वय ६५ या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. जळगावातील त्यांच्या नातीला बाळांतपणासाठी शाहूनगरातील एका रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कमलबाई या नातीकरीता जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या. डबा देवून साडेबारा वाजेच्या सुमारास त्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या.

यादरम्यान, दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास नूतन मराठा कॉलेजच्या समोर रस्त्याने पायी चालत असतांना याचवेळी दोघं भामट्यांनी कमलबाई यांना थांबवले. तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो असे म्हणून कमलबाई यांना रस्त्याच्या बाजूला बसवले. तसेच दुनियादारी चांगली नाही तुझ्या गळ्यातील पोत कागदावर ठेव आणि घरी गेल्यावरच उघड मागे बघू नको, असे त्यांनी वृद्धेला सांगितले. याचदरम्यान भामट्यांनी कागदाची पुडीची अदलाबदली केली.

वृद्धेने गळ्यातील पोत काढून कागदावर ठेवत शाहूनगर परिसरातील हॉस्पिटलमध्ये गेली. यानंतर वृद्ध महिलेने हातातील पुडी आपल्या नातीकडे दिली. तिने पुडी उघडून बघितली असता त्यात सोन्याची पोत दिसून आली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी वृद्धेने शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सिंकदर तडवी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *