ताज्याघडामोडी

घशात जेली चॉकलेट अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

लहान मुलांचे चॉकलेट हे अतिशय प्रिय खाद्य. चॉकलेट मिळाले की, त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मात्र हेच चॉकलेट खाणे कुणाच्या मृत्यूचे कारण ठरु शकेल असा विचारही कुणीच कधी केला नसेल. आज अशीच एक घटना घडली आहे. घशात जेली चॉकलेट अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. शर्वरी सुधीर जाधव (रा. कर्मवीरनगर-कोडोली, सातारा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

चिमुकल्या शर्वरीला शेजारच्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट दिले. ते चॉकलेट तिने गिळले. परंतु चॉकलेट तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. काही वेळातच ती बेशुद्ध पडली. हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात अल्यानंतर त्यांनी शेजारच्या लोकांना बोलावून शर्वरीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्वरीला तपासले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. घशात चॉकलेट अडकून मुलीचा मृत्यू झाल्याचा आईला मोठा धक्का बसला. तिच्या आईने हंबरडा फोडला. मातेचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *