ताज्याघडामोडी

देव्हाऱ्यातील दिव्याने आग भडकली, हजारोंच्या नोटा जळून खाक, पोलीस भरतीचं स्वप्नही धूसर

देव्हाऱ्यातील दिव्यामुळे घरात आग भडकून होत्याचं नव्हतं झालं. जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात ही घटना घडली. आज (सोमवारी) १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागली. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. इतकंच नाही, तर नुकतेच मिळालेले कामाचे पैसेही जळून खाक झाल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिरालाल बाबुलाल बाविस्कर (वय-६२ वर्ष, रा. आंबेडकर नगर, जुने जळगाव) आणि त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे शरद भगवान सपकाळे यांच्या घराला सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागली. काही वेळातच आगीने रुद्रावतार घेतला होता.

घराच्या बाजूला राहणारे रंजनाबाई निकम, गोपाल डोंगरे, अक्षय तायडे, महेंद्र मेहते, कुणाल डोंगरे यांनी धाव घेऊन घरातील आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरसेविका खुशबु बनसोडे यांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यात त्यांना यश आलं आहे. मात्र यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान या घटनेबाबत पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेले नाही. या आगीमुळे शेजारी असलेले पार्टिशनच्या घराने देखील पेट घेतला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे, आदी सामान जाळून खाक झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *