बायकोकडून ही नवऱ्याचा छळ केला जातो, याच्या तक्रारी आता भरोसा सेल आणि महीला समुपदेशन केंद्राकडे येऊ लागल्या आहेत. पुरूषच छळ करतो असे नाही तर महिलाही छळ करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. गोंदिया जिल्ह्यात दहा वर्षात तब्बल 584 पुरूषांचा बायकोकडून छळ करण्यात आल्याच्या तक्रारी भरोसा सेल आणि महिला समुपदेशन केंद्राकडे आल्या आहेत. तर आता महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग तयार करण्याची मागणी होत आहे.
कौटुंबिक कारणातून पती अथवा त्याच्या कुटुंबीयांकडून पत्नीचा छळ होत, असल्याचे अनेक प्रकार आजपर्यंत उघडकीस आले आहेत, परंतु आताही पुरूषांचाही छळ झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मागील दहा वर्षात गोंदिया जिल्ह्यातील 584 पुरूषांनी आपल्या पत्नीकडून छळ झाल्याची तक्रार भरोसा सेल आणि महिला समुपदेशन केंद्राकडे केली आहे.
भरोसा सेल व महिला समुपदेशन केंद्राकडे अशा दाम्पत्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. देशात कोरोनाचे संकट असताना या काळात कुटुंबे एकत्रित आली. लैंगिक समानता मानणाऱ्या देशांत केवळ स्त्रियांवरच कौटुंबिक अत्याचार होत असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु कोरोनाच्या काळात एकत्र राहत असलेल्या दाम्पत्यांना अधिक वेळ मिळाल्याने त्या वेळात त्यांनी एकमेकांच्या खोड्या काढण्यात जास्त वेळ घालवला. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे निर्माण झाली.
परिणामी कोरोनानंतरच्याही काळात या तक्रारी जास्त आल्या आहेत. लॉकडाउनमुळे कुटुंब एकत्रित आली. एकमेकांसोबत राहताना पती-पत्नीत खटके उडत होते. दहा महिन्यांपासून अशीच स्थिती असल्याने पती-पत्नीतील वाद चव्हाटयावर आलेत. आर्थिक अडचण व पती -पत्नी अतिसहवास हे वादाचे कारण आहे. अशी अनेक प्रकरणे भरोसा सेल आणि महिला समुपदेशन केंद्राकडे येत आहे.