ताज्याघडामोडी

दाम्पत्य पर्यटनाला महाबळेश्वरला, सेल्फी काढताना नवविवाहितेचा तोल गेला,दरीत कोसळली अन् सर्व संपलं…

महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून ठार झाली. ही घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, रा. उंबरेगव्हाण, ता.जि. धाराशिव. सध्या रा. धनकवडी, पुणे) हे पर्यटक दाम्पत्य सोमवार, दि. ९ रोजी दोन दिवसांसाठी दुचाकीवरून महाबळेश्वर पर्यटनास आले होते. सोमवारी हे दांपत्य विविध प्रेक्षणीय स्थळांसह केट्स पाॅईंट पाहून गेले होते. आज सकाळी त्यांनी येथील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.

दुपारी जेवण करून पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला होता. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॅाईंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने मात्र पुण्याचा लांबचा प्रवास दुचाकीवरून करावयाचा आहे. खूप वेळ जाईल म्हणून केट्स पॅाईंट न पाहता जाऊ असे अंकितास सुनील याने सांगितले, परंतु तिने हट्ट धरल्याने पती सुनीलचा नाईलाज झाल्याने हे दांपत्य दुपारी साडेचार वाजता केट्स पाँईट येथे पोहचले.

केट्स पॉईंट पाहून ते निडल होल व परिसरातील धबधबा पाहण्यासाठी पाईंटवरील सुरक्षा कठड्यावर बसून त्यांनी फोटो व व्हिडीओ काढले, असाच एक धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना अंकिता ही कठड्यावरून थेट तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात ती जागीच ठार झाली. पत्नी कोसळताच पतीने आरडाओरडा सुरू केला.हा गोंधळ ऐकून स्थानिकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांनी महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यासह वनविभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी व जवानांनी अपघातस्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *