ताज्याघडामोडी

‘मला माफ करा, गुडबाय लाईफ’ असं स्टेट्स टाकून 21 वर्षीय तरूणीची हत्या

‘गुडबाय’ असा नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून लिंगनूर (ता. कागल) मधील तरूणाने त्याच्या नात्यातील खोतवाडी (इचलकरंजी) मधील तरूणीचा पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात खून करून स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला.

ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१) असे मृत तरूणीचे नाव आहे. संशयित तरूण कैलास आनंदा पाटील (वय २८) याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू होते.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. आता लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध, नकार होता. त्यावर कैलास याने ऋतुजा हिला मंगळवारी भेटण्यास बोलविले. तिला चारचाकीतून घेवून तो गिरोली घाटात गेला. त्याठिकाणी त्याने तिचा खून केला.त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

तो मेसेज वाचून तरूणीच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यानंतर पोलिस मोबाईलचे लोकेशन तपासून गिरोली घाटाकडे रवाना झाले. पेठवडगाव आणि कोडोली पोलीसांकडून घटनास्थळी तपास सुरू होता. कैलास याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कैलास याच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. तो फरशी बसविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पुरवण्याचे काम करतो. ऋतुजा ही बी. एस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *