ताज्याघडामोडी

पंढरपुर तालुक्यात अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

पंढरपूर दि. (21):- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, तालुक्यातील इसबावी, आंबे तसेच चिंचोली भोसे या ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे जे.सी.बी, ट्रॅक्टर व डंपिग ट्रॉली व अवैध वाळू जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध 15 पथकांची नेमणूक केली आहे. 

मौजे इसबावी हद्दीतील पंढरपूर न.पा पाणी पुरवठा योजना येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतुक करताना एक जे.सी.बी. जप्त केला आहे. मौजे आंबे (ता. पंढरपूर) येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी विनापरवाना केलेला चार ब्रास वाळूसाठा जप्त केला असून, संबधिता विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. 

तसेच दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास चिंचोली भोसे (ता.पंढरपूर) येथून अवैधरित्या वाळु वाहतुक करताना ट्रॅक्टर व डंपिग ट्रॉली पकडण्यात आली आहे. संबधित वाहनांच्या मालकांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही चालू असून, सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे जमा करण्यात आली असल्याचे तहसिलदार लंगुटे यांनी कळविले आहे.

पथकात अप्पर तहसिलदार तुषार शिंदे, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, मंडल अधिकारी निलेश भंडगे, दिपक शिंदे, विजय शिवशरण, तलाठी प्रमोद खंडागळे, भैरुरतन गोरे, श्रीकांत कदम, समिर पटेल, कोतवाल अनिल सोनवले सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *