ताज्याघडामोडी

शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रा.शिवाजी सावंत यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी बंडाचे निशाण फडकावत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेत उद्धव ठाकरे हे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हिंदू विरोधी विचारसरणीस बळ देत आहेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवताना केला होता.आणि शिवसेनेत महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेला मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी सहमती दर्शवित शिंदे गटात सामील झाला होता.सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात बलाढ्य म्हणून ओळखले जाणारे वाकावं तालुका माढा येथील डॉ.तानाजी सावंत आणि प्रा.शिवाजी सावंत हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेस मोठा हादरा बसला.     

    प्रा.तानाजी सावंत हे महायुती सरकार मध्ये जलसंधारण मंत्री होते तर सोलापूर जिल्ह्याचे संर्पक प्रमुख पदही त्यांच्याकडे होते.महायुतीच्या सत्ता काळात डॉ.तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्थ वाढविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेस दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंतही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बोलून दाखवत आले.ना.तानाजी सावंतही या बाबत उघडपणे भाष्य करीत आले.पण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नसल्याने नाराजी वाढत गेली.आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सावंत बंधूनी यास पाठिंबा दर्शवित शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.

      आता शिवसेना शिंदे गटाचा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी प्रा.शिवाजी  सावंत यांच्यावर सोपविण्यात आली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी कॅबिनेट मंत्री डॉ.तानाजी सावंत हेही उपस्थित होते.         

    सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटास आणखी बळ मिळणार आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार सांगोला विधानसभा मतदार संघातून विजयी झाला.खरे तर हि पारंपरिक लढत होती मात्र आ.शहाजी बापू पाटील यांचा शिवसेना प्रवेश सांगोल्यात त्यांना बळ देणारा ठरला होता.याच वेळी माढा आणि मोहोळ मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधात संघर्ष केलेले संजय कोकाटे आणि सोमेश क्षीरसागर यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश महत्वपूर्ण ठरला तर कारमाळ्यातून २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवत विजय संपादन केलेले  नारायण पाटील आणि माजी आमदार रश्मी बागल यांना आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून एकत्र आणायचे कसब ना.तानाजी सावंत यांनी साधले.     

    आता प्रा.शिवाजी सावंत यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अधिकृत रित्या सोपवण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटास आणि बळ मिळाले असून प्रा.शिवाजी सावंत यांनी माढा तालुक्याच्या राजकरणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आ.बबनदादा शिंदे यांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात अनेक वेळा शड्डू ठोकत आव्हान दिल्याचेही दिसून आल्याने संघटनात्मक बांधणी बरोबरच प्रत्यक्ष निवडणुकांच्या व्यूह रचनेचा त्यांचा अनुभवही मोठा आहे.त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पालिका निवडणुकीत संर्पक प्रमुख म्हणून प्रा.शिवाजी सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटास बळ देतील असाही विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्मथकांकडून व्यक्त केला जात आहे.             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *