क्रेडिट कार्डच्या थकित बिल वसुलीसाठी आलेल्या खासगी वित्तीय संस्थेच्या चौघा जणांनी पोलिसाची गचांडी पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला.याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांविरद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अर्जुन लक्ष्मण राऊत (वय 19, रा. हडपसर), निखिल ज्ञानेश्वर ताम्हाणे (वय 37, रा. मुंढवा), परम नामदेव पाटील (वय 26, रा. थिटे वस्ती, खराडी), ऋषीकेश हनुमंत पंदिवाले (वय 24, रा. खराडी) अशी गुन्हा दखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 30 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हडपसर भागात राहायला असून तिचे वडील पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. तरुणीच्या आईच्या नावावर क्रेडिट कार्ड असून त्याचे बिल थकलेले आहे. थकीत बिल वसुलीसाठी मंगळवारी (दि.6) राऊत, ताम्हाणे आणि त्यांचे दोन साथीदार सोसायटीत आले. यावेळी थकीत बिलाच्या वसुलीसाठी त्यांनी सोसायटीच्या आवारात शिवीगाळ केली. तसेच, तरुणीच्या वडिलांना आरोपींनी धक्काबु्क्की करत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणीला शिवीगाळ करून तिच्याशी असभ्य वर्तन केले. यानुसार पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.