ताज्याघडामोडी

सरपंचाने घरकुलासाठी मागितले पैसे, एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडले

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात एका सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार (वय-46) यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. एका लाभार्थीला घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी 9 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी केली.

श्रीकांत सत्यनारायण ओलालवार (रा. आंबेडकर वार्ड, चामोर्शी) हे विक्रमपूर येथील सरपंच आहेत. ओलालवार यांनी नवग्राम येथील तक्रारदाराला घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता 10 हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर या तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत याबाबतची तक्रार केली. तर दुसरीकडे तडजोडी केल्यावर सरपंच 9 हजार रुपये घेण्यास तयार झाला होता. ही 9 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या सरपंचाला रंगेहाथ पकडत ताब्यात घेतले.

स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येक जण या अनुषंगानं आर्थिक नियोजन करत असतो. परंतु, समाजात असेही काही घटक असतात, की त्यांचं मासिक, वार्षिक उत्पन्न अत्यंत नाममात्र असतं. या उत्पन्नात स्वतःच्या घराचं स्वप्न साकारणं केवळ अशक्य असतं. कारण या घटकांना घराची किंमत, कर्ज आणि त्याचे हप्ते या बाबी परवडणाऱ्या नसतात. म्हणून घरकुलच्या माध्यमातून घर मिळावी, अशी या दुर्बल घटकातील लोकांची अपेक्षा असते. मात्र, या घरकुलाच्या नावावर सरपंचाने लाच मागतली होती. त्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *