ताज्याघडामोडी

स्वेरीच्या आकांक्षा हजारे यांनी पहिल्या पगारातून पालवी या संस्थेला दिली रु. ११ हजारांची देणगी

पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी कु. आकांक्षा धनंजय हजारे यांनी साधारणपणे चार वर्षांपूर्वी बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर स्वेरी मध्ये  कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग या  विभागात प्रवेश घेतला. वसतिगृहात राहुन स्वेरीच्या संस्कारांचे पाठ गिरविले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना, आदर आणि शिस्त त्यांच्या अंगवळणी पडली. चार वर्षे उत्तम प्रकारे अभ्यास केल्यानंतर स्वेरीच्या प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून कॅम्पस प्लेसमेंट द्वारे त्यांची  हेक्झावेअर, एन.टी.टी डेटा व क्रेस्ट इन्फोटेक या तीन कंपन्यात निवड झाली. सध्या आकांक्षा हया एन.टी.टी. डेटा या कंपनीत कार्यरत आहेत. नुकताच त्यांचा  पहिला पगार हाती आला. अनेक जण पहिला पगार हा आई- वडिलांकडे सोपवितात पण आकांक्षा यांनी मात्र आलेल्या  पहिल्या पगारातील ११ हजार एवढी रक्कम कोर्टी रोडलगत असलेल्या ‘पालवी’ या बाल संगोपन करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून देऊ केली. याच दानशूर वृत्तीमुळे आकांक्षा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
       बालपणी आई वडील आणि महाविद्यालयात शिक्षक वर्गाकडून झालेल्या संस्काराचा हा परिणाम आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे,  कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षा यांनी यशस्वीपणे शिक्षण घेतले. एड्सग्रस्त मुला मुलींचे संगोपन करणाऱ्या पंढरपूर येथील प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी या प्रकल्पास आकांक्षा धनंजय हजारे यांनी  आपल्याला मिळालेल्या पहिल्या पगारातून ११ हजार रुपयांची देणगी दिली. १२५ हून अधिक निष्पाप बालकांचे संगोपन करणाऱ्या पालवी संस्थेच्या संचालिका मंगलताई शहा यांच्याकडे सदरची रक्कम सुपूर्द करण्यात आली. पालवी एक घर आहे एचआयव्ही पॉझिटिव्ह बालकांचे,  कोणीतरी केलेल्या/नकळत झालेल्या चुकांचे परिणाम ही निरागस बालके भोगत आहेत. अशा बालकांचे चेहरे प्रफुल्लित करण्यासाठी समाजाचे हात पुढे आले पाहिजेत हा विचार आकांक्षाने आपल्या कृतीतून जोपासला आहे. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांना मातृत्वाचा आधार मिळावा यासाठी लवकरच पालवीमध्ये मातृवन हा निवासी प्रकल्प उभारला जाणार आहे.  यावेळी अॅड धनंजय हजारे, सौ. माधुरी हजारे, प्रा. विनायक कलुबर्मे, जयवर्धन हजारे आदी उपस्थित होते. या स्तुत्य कार्याबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी आकांक्षा हजारे यांचे  अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *