ताज्याघडामोडी

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती

एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समितीदेखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

“आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू”

“आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *