ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून ”चौथ्या” उमेदवाराची जोरदार पण छुपी तयारी ?

गाठीभेटींचे ”गुपचूप” सत्र सुरु !

        पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीबाबत या दोन्ही तालुक्यातील जनतेला मोठी उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून उमेदवार म्हणून कुणाला मैदानात उतरवले जाणार  या बाबत अंदाज व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीच्या विविध वरिष्ठ नेत्यांची वक्तव्य यावर भालके समर्थक आणि विरोधक या दोन्ही गटाच्या समर्थकांबरोबरच सामान्य जनतेचे बारीक लक्ष असल्याचे दिसून येते.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात भालके,परिचारक आणि आवताडे हे तीन प्रबळ राजकीय गट गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आमने सामने आले असून या तीनही प्रस्थापित राजकीय विरोधकांत आगामी पोटनिवडणुकीत लढत होईल असा सहजसरळ अंदाज व्यक्त केला जात असतानाच पंढरपूरातून ऐन निवडणुकीच्या आधी काही दिवस आणखी एक नाव पुढे येणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.पंढरपूर आणि २२ गावे पुरते ”घनिष्ठ ओळखीचे”प्रभाव क्षेत्र असलेला हा इच्छुक नेता सध्या विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुपचूप गाठीभेटी घेत असल्याची चर्चा असून जर तिरंगी लढत झालीच तर माझा विजय निश्चित आहे असे आत्मविश्वासाने पटवून देत असल्याचे समजते.आपण आमदारकी लढवणार असल्याचा ”कानमंत्र” सध्या गुपचूपपणे समर्थक असलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्याला दिला जात असून ”तयारीत रहा काही कमी पडू देणार नाही ” असे आश्वासनही दिले जात असल्याची चर्चा आहे.                             
       गेल्या २५ वर्षाच्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात तिसरी ताकत अपयशी ठरली तरी निर्णायक भूमिका बजावत आली असून अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत याचा प्रयत्य आला आहे.आणि त्यामुळेच जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणूक लागल्या तेव्हा नंबर तीनचा उमेदवार कोण असणार हे महत्वाचे ठरत आले आहे.अर्थात भारतीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करीत शेकडोच्या संख्येने जरी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले तरी हरकतीचा मुद्दा होत नसला तरी या तालुक्यात कधी पिंपरी चिंचवडच्या मा.खा. किसन बाणखेले यांच्या विजयाप्रमाणे  कधीही अनपेक्षित चमत्कार घडला नाही.२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे प्रबळ दावेदार म्हणून समाधान आवताडे यांचे नाव पुढे आले,पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा भौगोलिक विचार करता या मतदार संघात पंढरपुर शहर आणि तालुक्यातील केवळ २२ गावे समाविष्ट आहेत मात्र  मंगळवेढा शहर आणि संपूर्ण तालुक्याचा यात समावेश असल्याने या मतदार संघात मंगळवेढा शहर तालुक्यातील मतदारांची संख्या जास्त आहे.आणि त्यामुळेच भूमिपुत्र म्हणून पुढे आलेली समाधान आवताडे यांची उमेवारी प्रभावी ठरली असली तरी दोन्ही विधानसभा निवडणुकीत विजयापासून ते खूप लांब राहिले आहेत.मात्र त्यांना मिळालेली मते नंबर एक आणि नंबर दोनसाठी महत्वपूर्ण ठरली आहेत.आगामी विधानसभा निवडणुक परिचारक गट लढविणार का ? समाधान आवताडे उभारणार का ? याची चर्चा होत असतानाच हे पारंपरिक विरोधक विधानसभा निवडणूक लढवतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत असले तरी तूर्तास तरी परिचारक आणि आवताडे गटाकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त होत नसल्याचे दिसून येत आहे.         
   मात्र या साऱ्या घडामोडीत विविध पक्षाचे पदाधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी अतिशय ”जिव्हाळ्याचे” वैयक्तिक संबंध जपलेल्या एका नेत्याकडून आगामी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा असून यातील प्रत्येकाशी विशेष संपर्क करून,खांद्यावर हात टाकून मला सहकार्य करावं लागतंय असा आग्रह केला जात असल्याचे समजते.हे करत असताना आपण कसे ”स्वतंत्र” विचाराचे आहोत हे गळी उठविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. 
         डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील हे सद्या पंढरपूर तालुक्याच्या  पटलावर उदयास आलेले नेतृत्व समजले जात असून अभिजित पाटील हे सध्या तरी कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेण्याऐवजी आणि निवडणुकीच्या राजकारणावर भाष्य करणे टाळत आहेत.आपल्या तालुक्यातील युवक जे व्यवसाय,उधोग आणि स्वरोजगार या माध्यमातून राजकारणापेक्षा महत्वाचा समजला जाणारा अर्थकारणाचा लढा यशस्वी करण्यासाठी धडपडत आहेत,काहीतरी वेगळे करून आपल्या कुटूंबासह आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे अशी राजकारण विरहित भूमिका घेत आहेत.मात्र त्याच वेळी ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याबाबत मात्र महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यामुळेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणुकीत ते पॅनल उतरवणार असा अंदाज व्यक्त होत आहे.मात्र पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत मात्र अभिजित पाटील हे चवथे उमेदवार नसतील असा विश्वास अभिजित पाटील यांच्याकडून पंढरपूर शहर व तालुक्यापुरता ठेवला जात असलेला जनसंपर्क,गाठीभेटी यामुळे व्यक्त होताना दिसून येत आहे.मात्र त्याच वेळी विठ्ठलचा गड सर केल्यानंतर माढा विधानसभा मतदार संघ हे अभिजित पाटील यांचे पुढचे ”टार्गेट” राहील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.   
      त्यामुळेच पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीत २०१६ ला पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी मतविभागणीचा पॅटर्न वापरला जाईल,चवथा दावेदार म्हणून वेगळेच नाव पुढे येईल आणि शहर व तालुक्यातील २२ गावातील मतांची आणखी विभागणी झाल्यास त्याचा फटका कुणाला बसेल  हे आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *