ताज्याघडामोडी

पाचशे रुपये वर्गणी देण्यास नकार, दुकानदाराला मारहाण, सात जणांवर गुन्हा; चौघांना अटक

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणताही सार्वजनिक उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी सर्व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यातच दोन दिवसांनंतर असलेला दहीहंडी उत्सव हा तरुणांचे आकर्षण असतो. मात्र अनेक मंडळे जेव्हा जेव्हा घरी, दुकानात वर्गणी मागणीसाठी जातात. तेव्हा त्यांच्या मर्जीप्रमाणे वर्गणी द्यावी असा अट्टहास समोरच्या व्यक्तींना करतात. यातूनच पिंपरीमधील वाकड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दहीहंडी साठी 500 रुपये वर्गणी दिली नाही म्हणून स्वीट दुकानदाराला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दहीहंडी मंडळाच्या कार्यकर्त्यानी ही मारहाण केली आहे. राहुल गुप्ता असं मारहाण झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वरून वाकड पोलिसांनी प्रसाद राऊत, मनोज कदम, माऊली उपल्ले, यश रसाळ यांना अटक केलीय. तर रोहित शिंदे, सुनील शेट्टी, विजय तलवारे यांच्या सह 3 ते 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाकड परिसरातील एक दहीहंडी मंडळाचे कार्यकर्ते स्वीट दुकानाच्या मालकाकडे वर्गणी मागणीसाठी गेले होते. त्यांनी ठराविक रक्कम वर्गणी म्हणून देऊ केली. मात्र, या कार्यकर्त्यानी 500 रुपयेच वर्गणी म्हणून हवे आहेत. ते नाही देत म्हटल्यावर या कार्यकर्त्यानी त्या दुकान मालकाला जबर मारहाण केली. आणि आम्हाला हप्ता सुरू करावा अशी मागणी देखील केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील काहीजण अल्पवयीन आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कुठलेही मंडळ अथवा कुणीही जबरदस्तीने वर्गणी गोळा करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *