ताज्याघडामोडी

राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्रकं वाटायला पाठवलं, पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या चेंबूर परिसरातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती.

तसेच मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.

तर दुसरीकडे पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायाला गेल्यास त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात आक्रमक होणार का, हे पाहावे लागेल.

राज ठाकरेंच्या पत्रकात नेमकं काय?

राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्विट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.

१. जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.

२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.

३. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *