ताज्याघडामोडी

LPG सिलेंडरच्या दरात १३५ रुपयांची घसरण; जाणून घ्या, नवे दर

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्यात गॅस सिलेंडरचेही भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठी कात्री लागत होती.

इंधनदरवाढीमुळे महागाईचे चटके सोसावे लागत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करून केंद्र सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.

इंडियन ऑइलने १ जून रोजी जाहीर केलेल्या किमतीनुसार, १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. १ जून रोजी दरात कपात केल्यानंतर आता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर २३५४ ऐवजी २२१९ रुपयांना मिळेल. तसेच कोलकाता येथे २४५४ ऐवजी २३२२ रुपये, मुंबईत २३०६ ऐवजी २१७१.५० रुपये आणि चेन्नईत २३७३ ऐवजी २५०७ रुपयांना मिळेल. कंपन्यांनी केलेल्या दरकपातीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल, असे म्हटले जात आहे. यापूर्वी १ मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

गॅस पुरवठादार कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत तूर्तास तरी कोणताही बदल केलेला नाही. याआधी जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त १२ सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा ९ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे. तत्पूर्वी, मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. ७ मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले होते. तसेच १९ मे रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत बदल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *