ताज्याघडामोडी

रुपाली चाकणकर यांना अहमदनगरमधून गेला धमकीचा फोन; आरोपी ताब्यात, ‘हे’ सांगितले कारण

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील भाऊसाहेब शिंदे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी शिंदे याने चक्रावणारा दावा केला आहे. काही लोकांनी सॅटेलाईटद्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला आहे. माझ्या पत्नीलाही अशाच पद्धतीने त्रास दिला जात आहे. या बाबत तक्रार आम्ही महिला आयोगाकडे करून काही उपयोग झाला नाही. असा भलताच कांगावा आरोपीने केल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याचा धमकी देणारा फोन 30 मे रोजी आला होता. दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयातून याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सूत्र फिरवली आणि अखेरीस अहमदनगरमधून एका विकृत व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब शिंदे या तरुणाने हा फोन केला होता. त्याने तशी कबुलीही दिली आहे. पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब शिंदे याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी रवाना केले आहे. यावेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी आणि लहान मुलगा दिसून आला आहे.

रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस चक्र फिरली. तक्रारीनंतर भाऊसाहेब रामदास शिंदे याला नगरजवळच्या चिचोंडी पाटील येथून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांचे पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडे या फोनबद्दल प्राथमिक चौकशी केली. त्यावर त्याने केलेले दावे चक्रावून टाकणारे आणि अफलातून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *