गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नातीची छेड काढल्याचा सूनेचा आरोप, माजी परिवहनमंत्र्यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

उत्तराखंडच्या माजी परिवहन मंत्र्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 59 वर्षीय राजेंद्र बहुगुणा यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सूनेने त्यांच्यावर नातीसोबत छेडछेड केल्याचा गंभीर आरोप केला होता.

हा आरोप सहन न झाल्याने अखेर त्यांनी मृत्यूला कवटाळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुगुणा यांच्या सूनेने त्यांच्याविरुद्ध नातीसोबत छेडछोड केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूनेने आरोप केल्यापासून बहुगुणा यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. अखेर बुधवारी ते हल्दाना येथील भगत सिंग कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढले. पाण्याच्या टाकीवर चढण्यापूर्वी आपण आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी 112 (आपातकालीन नंबर) नंबरवर फोन करून कळवले होते.

बहुगुणा यांच्या फोननंतर पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन ते खालीही उतरले मात्र, अचानक त्यांनी पिस्तूल उचलली आणि स्वत:वर गोळी चालवली. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती एसएसपी पंकज भट यांनी दिली आहे.

याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बहुगुणा यांची सून कौटुंबिक कलहामुळे आपल्या पतीसोबत रहात नाही. तीन दिवसांपूर्वी तिने राजेंद्र बहुगुणा यांच्यावर नातीसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला. सूनेने केलेल्या आरोपाने ते व्यथित झाले होते आणि उदास राहू लागले होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी आता राजेंद्र बहुगुणा यांच्या मुलाने वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे म्हणत पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *