छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गावच्या प्रवेश द्वारावरील गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वार लिहिलेलं बॅनर हटवण्यावरून जालन्यात मोठा वाद झाला.
संतप्त जमावाने यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या गावात ही घटना घडली असून, पोलिसांनी यावेळी हवेत गोळाबार देखील केला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
जालन्यातील चांदई एक्को गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झालाय. गावच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. तर पुतळ्याजवळच गावच्या प्रवेशद्वाराला गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वार असं नाव देण्यात आलं. यावरून गावकऱ्यामध्ये वाद झाला. त्यामुळे प्रशासननाने प्रवेश द्वारावरील गोपीनाथ मुंडे असं नामकरण करण्यात आलेलं बॅनर काढून छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आलंय. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.