ताज्याघडामोडी

“शिरूरचे पुढील खासदार शिवाजी आढळराव पाटीलच असणार”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, “उद्या मी पण.”

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. असं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या शिरूरमधून पुढच्यावेळी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होतील असं वक्तव्य केलं.

त्यानंतर चर्चांना उधाण आलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय.

अजित पवार म्हणाले, “संजय राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी ते वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करील, पण उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना आहे? संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे?”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

“शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत,” असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते खेडमधील आंबेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. विशेष म्हणजे सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहेत. असं असताना संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

“कुणी काहीही म्हटलं तरी भविष्यात आढळराव हे संसदेत असतील”

“शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. आढळरावांनी शिरूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी भविष्यात आढळराव हे संसदेत असतील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो,” असंही संजय राऊत म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *