गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच मनसुख हिरेन हत्येतील मुख्य आरोपी- NIA

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.

एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला होता, जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते. सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने प्रतिज्ञापत्रत दाखल केले होते त्यात ही माहिती समोर आली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 17 जुलै रोजी ठेवली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात सांगितले होते की, परमबीर सिंग हेच मनसुख हिरेन आणि अँटिलीया बॉम्ब प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. परमबीर सिंग यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचाही आरोप देशमुखांनी केला होता. परमबीर सिंग यांना विधानभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले त्यावेळी परमबीर यांनी योग्य माहिती दिली नसल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

हे सर्व पाहता मुख्यमंत्र्यांनी आणि मी गृहमंत्री असताना लगेचच परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेऊन त्यांना डीजी होमगार्डकडे पाठवले. अनिल देशमुख म्हणाले होते की, परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितले की, सचिन वाझे हे परमबीर सिंहांच्या जवळचे अधिकारी होते. परमबीर सिंग हे वसुलीचे काम सचिन वाझे यांना देत असत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. त्यानंतर या हत्या प्रकरणातील संशयितांची चौकशी करण्यात आली होती. आता एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आरोपी म्हणून जेलमध्ये असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. आता उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीवेळी न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *