समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करुन त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली.
अमोल बाळकृष्ण ताल्हण असे मृत युवकाचे नाव आहे. मृताचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना होती. आपल्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध जर समाजात माहिती पडले, तर आपली बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या पित्याने अमोल याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली.
जखमी अवस्थेत अमोल याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी पित्याला अटक केलीय.
मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरुन हत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पुलगाव येथे भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.