ताज्याघडामोडी

सोलापूरसह उस्मानाबाद, जालना, लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. अकोला, भंडारा, वाशिम, गडचिरोली आणि गोंदियातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान रत्नागिरीत शुक्रवारी (11 जून) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्रीपर्यंत 92.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रूजमध्ये 51.4 मिमी पाऊस पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *