तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि कार घेण्याचा विचार करत असाल, तर हे काम लवकर पूर्ण करा.
कारण येत्या काही दिवसांत दिल्लीत कार खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेईकल), कार आणि एसयूव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण परिवहन विभागाने काही ठराविक श्रेणींच्या वाहनांवरील रोड टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
दिल्लीतील खासगी वाहनांवरील रोड टॅक्स सध्या इंधनाचा प्रकार आणि प्राईस रेंजनुसार 12.5 टक्के आहे. दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये विविध कर आणि शुल्कांमधून 2,000 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
यासोबतच देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी सोमवारी, भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने त्यांच्या संपूर्ण मॉडेल रेंजच्या किमती 0.9 टक्के आणि 1.9 टक्क्यांच्या दरम्यान तत्काळ प्रभावाने वाढवल्या आहेत.
कंपनी, जी सध्या अल्टो ते एस-क्रॉस पर्यंत कारची रेंज विकते, त्यांनी वाढत्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीवर 18 एप्रिलपासून दरवाढ लागू होऊन, सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये (नवी दिल्ली) 1.3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात, दिल्ली परिवहन विभागाने बस मार्गांचे उल्लंघन करणाऱ्या छोट्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसेससाठी निश्चित केलेल्या लेनमध्ये पार्क केलेली 50 हून अधिक वाहने हटवली असून या वाहनांच्या चालकांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. टो केलेल्या वाहनांमध्ये छोट्या कार, ऑटो, ई-रिक्षा आणि दुचाकी यांचा समावेश होतो.