गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बायकोला नांदण्यास पाठवत नव्हते; जावयाची सासरवाडीत आत्महत्या

पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेवगा येथे जालना तालुक्यातील भाटेपूरी येथील सासुरवाडीत जावयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपक दत्ता भोंडे (28) याने सासरवाडीतील शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

दीपक याने बुधवारी आत्महत्या केली तर गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पत्नीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील दीपक दत्ता भोंडे याचे अंबड तालुक्यातील शेवगा येथील शारदा जगन्नाथ शेळके हिच्यासोबत 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक दहा वर्षाच्या मुलगा आहे. लग्न झाल्यापासून काही दिवसातच त्यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे शारदा ही तीन वर्षांपासून माहेरी राहत होती.

दीपक हा शारदाला समजावून आपल्या गावी भाटेपुरी येथे घेऊन जाण्यासाठी बुधवारी सासरवाडीला आला होता. त्यावेळी शारदा व तिचे आई- वडील व दोन भाऊ यांनी तिला सासरी पाठवण्यास नकार दिला. दीपक आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद झाला. त्यांनी दीपकला शिवीगाळ केल्याने हा अपमान सहन झाला नाही. दीपक भोंडेने सासऱ्याचा शेतात जात गळफास घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी मृत दीपक भोंडेचा भाऊ रामेश्वर दत्ता भोंडे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसात पत्नी शारदा,सासरा जगन्नाथ शेळके,सासू जनाबाई शेळके, मेव्हणा शिवनाथ व बालाजी शेळके (सर्व रा. शेवगा ता.अंबड) आणि शारदाच्या आत्याचा मुलगा अर्जुन नामदेव घोगडे (रा.भाटेपुरी, ता.जि. जालना) यांच्या विरोधात अंबड पोलिसात कलम 306,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील हे करत आहेत. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पंतगे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *