ताज्याघडामोडी

पाणीपुरी खाण्यास नकार, शेजारीण भडकली, धक्काबुक्कीत डोक्यावर पडून वृद्धेचा मृत्यू

पाणीपुरी म्हणजे अनेक खवय्यांसाठी जीव की प्राण असतो. पाणीपुऱ्या देशातील काही भागात गोलगप्पे तर कुठे गुप चुप, तर कुठे पताशी या नावाने ओळखल्या जातात. याच पाणीपुऱ्या खाण्यास नकार दिल्याने शेजारी राहणाऱ्या चौघी महिलांनी वृद्धेला धक्काबुक्की केली. या घटनेत वृद्ध महिलेला प्राण गमवावे लागले. दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील जीटीबी एन्क्लेव्ह परिसरात ही विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे.

पाणीपुरी खाण्यास नकार दिल्याने शेजारी महिलांनी वृद्धेची हत्या केल्याचा आरोप आहे. पाणीपुरी खाण्यास नाही म्हटल्याने शेजाऱ्यांशी महिलेची बाचाबाची झाली होती. यावरुन चौघी जणींनी वृद्ध महिलेला धक्काबुक्की केल्याचा दावा केला जात आहे. यावेळी डोक्यावर पडल्याने वृद्धा गंभीर जखमी झाली. सुनेने तिला रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शकुंतला देवी (वय ६८ वर्ष) असे मयत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सुनेने चार आरोपी महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चार महिलांना ताब्यात घेतले.

सुनेने तक्रारीत म्हटले आहे की, तिची सासू दाराजवळ उभी होती. यावेळी शेजारी राहणारी शीतल नामक महिला हातात पाणीपुरी घेऊन जात होती. शीतलने वृद्धेला पाणीपुरी खाण्यास सांगितले असता तिने नकार दिला. या गोष्टीने शीतलला खूप राग आला आणि यावरुन दोघींमध्ये मोठा वाद झाला. काही वेळाने शीतलची आई आणि दोघी वहिनीही घटनास्थळी आल्या. चौघींनी मिळून तिच्या सासूला बेदम मारहाण सुरू केली आणि ती खाली पडली. पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *