फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी विक्रेत्या तरुणाला मारहाण करुन पाया पडायला लावले तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
या संबंधी चार व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात या गुंडांनी एका तरुणाला त्याच्या आईसमोर कपडे फाटेपर्यंत मारहाण करुन पाया पडायला लावले आहे. बालाजीनगरमधील गुलमोहर अपार्टमेंटसमोर हा प्रकार घडलेला दिसून येत आहे.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवर रायडिंग करत आलेल्या गुंडांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात असल्याचे दिसून येत आहे. अन्य एका व्हिडिओत बालाजीनगरमधील गुंडाची टोळी हातात कोयते घेऊन जाताना दहशत माजवतो आहे.
याबाबत परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे पहायला मिळत आहे. अशा घटनांमुळे मुलांमध्ये भीती उरली नसून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना छेडणे, हत्यार दाखवणे धमकी देणे हे राजरोस सुरू आहे.
त्यामुळे या गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित केला जातोय. सहकारनगर पोलीस स्टेशन व धनकवडी पोलीस चौकीतून नागरिकांना सांगितले जाते की तुम्ही तिथे राहू नका? त्यामुळे पोलिसांवर देखील आता या गुंडांची दहशत बसली आहे का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
i