कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन काळात वांद्रे परिसरात हजारो परराज्यातील मजुरांचा मोठा जनसागर रेल्वे स्टेशन परिसरात धडकला होता. त्यांना आपापल्या राज्यात रेल्वेने घरी जायचं होतं. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता.
कोरोनाची पहिली लाट मुंबईत त्यावेळी प्रचंड फोफावत होती. अशावेळी एवढ्या मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर एकत्र जमल्याने देशभरात खळबळ उडाली होती. याच घटनेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली.
काँग्रेसने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात मुंबईतील उत्तर भारतीय श्रमिकांना मोफत रेल्वे तिकीटे दिली. त्यामुळे मुंबईत धडकलेला कोरोना हा उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, उत्तराखंड सारख्या अनेक राज्यांमध्ये पसरला, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला.
नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
“कोरोना ही जागतिक महामारी आहे. पण त्याचाही राजकारणासाठी उपयोग केला गेला. हे मानवतेसाठी योग्य आहे? या कोरोना काळात काँग्रेसने तर हद्दच केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश जेव्हा लॉकडाऊन लागू करत होता, सर्व तज्ज्ञ सांगत होते, जो जिथे आहे त्याने तिथेच थांबावं, संपूर्ण जगभरात हा संदेश दिला जात होता, कारण एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असेल आणि तो एकीकडून दुसरीकडे जाईल तर तो कोरोनाला सोबत घेऊन जाईल.
तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी काय केलं? मुंबईच्या रेल्वे स्थानकावर उभं राहून मुंबई सोडून जाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईत श्रमिकांना मोफत तिकीटे वाटले गेले. लोकांना प्रेरित केलं गेलं. जा, महाराष्ट्रात आमच्यावर जो भार आहे तो थोळा कमी करा. जा, तुम्ही उत्तर प्रदेशाचे आहात, बिहारचे आहात, जा तिथे कोरोना पसरावा”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
“तुम्ही हे खूप मोठं पाप केलं. तिथे अफरातफरीचं माहौल तयार केलं. तुम्ही आमच्या श्रमिक बंधू-बगीणींना अडचणीत टाकलं. त्यावेळी दिल्ली सरकारने संकट मोठं आहे, गावी जा, असं सांगितलं. त्यामुळे युपी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कोरोना पसरला. मानवजातवर संकट समयी हे कोणतं राजकारण आहे? काँग्रेसच्या या वागणुकीमुळे पूर्ण देश अचंबित आहे. देश खूप मोठ्या संकटाला सामोरं जात आहे.
हा देश तुमचा नाहीय का? तुम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना चांगंलं आवाहन केलं असतं तर भाजप आणि केंद्र सरकारचं काय नुकसाण झालं असतं? काही लोकं कोरोना काळात मोदीच्या प्रतिमेला बाधा पोहोचण्याची वाट बघत होते. त्यांनी खूप वाट बघितली. तुम्ही इतरांना कमी लेखण्यासाठी महात्मा गांधीजींचा उल्लेख करतात”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.