गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महावितरणचे बनावट संकेतस्थळ तयार करून वीजबिलाची वसुली

महावितरणचे बनावट संकेतस्थळ तयार करून वीज बिलाची रक्कम उकळणाऱ्या ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकाला हेरून ते भरण्यासाठी मोबाईलवर एसएमएसद्वारे लिंक पाठवली जात होती.

सदर लिंक ओपन केली असता हुबेहूब महावितरणचे संकेतस्थळ ओपन होते. त्यावर वीज बिलाची रक्कम भरली असता ती महावितरणच्या खात्यात न जाता भलत्याच खात्यात जात होती. याप्रकरणी पोलिसांनी झारखंड येथून चरकू खबूलाल मंडल या 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

वीज ग्राहकांची बिल भरणा केंद्रावर जाण्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा गैरफायदा झारखंडच्या तरुणाने घेतला आहे.

त्यानुसार त्याने महावितरणच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तसेच ज्या ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे, त्यांच्या मोबाईलवर थकीत वीज बिल भरण्याबाबत लिंक पाठवली जात होती.

सदरची लिंक ग्राहकाने ओपन केली असता थेट बनावट संकेतस्थळ ओपन होते. तसेच येथे बिल भरल्यास त्याची रक्कम थेट महावितरणच्या खात्यात जमा न होता, दुसऱ्या खात्यामध्ये जमा केली जात होती. त्यामुळे बिल भरल्यानंतरही संबंधित ग्राहकाकडे बिलाची रक्कम थकीत असल्याचे दिसते.

याबाबत ग्राहकाकडून तक्रारी आल्यानंतर महावितरणने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी चरकू मंडल या तरुणाला अटक केली आहे. मात्र सध्या तो एका सायबर गुह्याखाली दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *