सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात सोनेरी रंगाचे धातूचे बिस्किट देत दोन अज्ञातांनी वेळेकामथी (ता. सातारा) येथील महिलेकडील 33 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले. पद्मा सुनील शिंदे (वय 55) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
पद्मा शिंदे बसस्थानकापासून चालत पोवई नाक्याकडे येत होत्या. तहसीलदार कार्यालयासमोर आल्या असताना त्यांना वाटेत एक धातूचे बिस्कीट पडल्याचे दिसले. त्यांनी ते उचलले.
याचदरम्यान त्याठिकाणी एकजण आला. त्याने शिंदे यांना रस्त्यात पडलेले सोन्याचे बिस्किट रस्त्याकडेला असणाऱया शेडमधील व्यक्तीने उचलल्याचे सांगितले. तुम्ही त्यांच्याकडे चला आणि दुसरे बिस्किट घ्या, असे सांगितले.
त्यानुसार शिंदे त्या अनोळखी व्यक्तीबरोबर शेडमध्ये बसलेल्या दुसऱया व्यक्तीकडे गेल्या. त्याने बिस्किट देण्याच्या बदल्यात दागिने मागितले. शिंदे यांनी 33 हजारांचे दागिने त्याच्याकडे देत त्याच्याकडे असणारे धातूचे बिस्किट घेतले.
शिंदे यांनी त्याची माहिती फोनद्वारे मुलास दिली. मुलाने येऊन पाहणी केली असता, बिस्किट खोटे आढळले. या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.