ताज्याघडामोडी

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, 7 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी (7 जून) देशवासियांशी संवाद साधला. देशात 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधानांनी केली. तसंच कोरोनाची दुसरी लाट अद्यापही गेलेली नाही. कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा देण्यात आली होती. हीच सुविधा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही कायम राहणार आहे. मे आणि जूनमध्ये ही योजना सुरू राहणार असून, पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.

देशातील गरीब जनतेसोबत त्यांचे साथी बनून सरकार खंबीरपणे त्यांच्यासोबत उभं असल्याचं मोदी म्हणाले. 80 कोटीहून अधिक नागरिकांना या योजनेंतर्गत मोफत धान्य देण्यात येणार आहे. ही सुविधा यापुढेही नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आता PM गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानातून दिवाळीपर्यंत मोफत धान्य घेऊ शकतात. देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये हेच यामागील उद्दिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट अद्याप आहे. कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. गेल्या 100 वर्षातील ही मोठी महामारी आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. देशात जगभरातून औषधं मागवण्यात आली, तसंच कोरोना काळात सर्वाधिक औषधनिर्मिती करण्यात आली. आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या गेल्याचं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं.

तसंच, भारतात अतिशय कमी काळात एका वर्षातचं दोन लशींचा शोध लावला गेला. देशात इतर लशींनाही मान्यता दिली गेली. कोरोनासाठी लसीकरण हे सुरक्षाकवच आहे. आतापर्यंत 23 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरणं करण्यात आलं आहे. लसीकरण अजूनही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. 7 कंपन्याकडून लस निर्मिती सुरू आहे, तर 3 कंपन्यांचं ट्रायल सुरू आहे. नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लशीचं ट्रायल सुरू असून ही लस नाकात स्प्रे करता येणार असल्याची माहितीही मोदींनी दिली.

कोरोनाशी लढाई अद्याप सुरूच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा सुरू असून दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. भारत सरकार आता लशी स्वत: खरेदी करुन राज्यांना मोफत देईल. आता 21 जून पासून 18 वर्षावरील सर्व लोकांना मोफत लस मिळणार असून लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्राकडे असेल, असंही मोदींनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *